राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे. अयोध्येच्या कारसेवकपुरम परिसरात त्यांनी विवाह केला आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
जयपूर, राजस्थानचे रहिवासी असलेले डॉ. महेंद्र भारती हे 1990 साली लग्नासाठी पात्र झाले होते, पण त्याचवेळी कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने ते खूप व्यथित झाले. त्यांनी त्याचवेळी एक संकल्प केला होता. जोपर्यंत अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असा संकल्प केला होता.
रामलला विराजमान झाल्यानंतर आता डॉ. महेंद्र भारती यांनी अजमेर येथील रहिवासी असलेल्या डॉ. शालिनी गौतम यांच्याशी अयोध्येत लग्न केलं आहे. 33 वर्षांनी हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर या कपलने लग्न केलं.
डॉ. महेंद्र हे 20 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांची जीवनसाथी शालिनी गौतम कॉलेजमध्ये शिकवते. लग्नासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असंही ते म्हणाले. सनातन संस्कृतीच्या पुनर्स्थापनेचा हा काळ आहे. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही हे खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.
डॉ. महेंद्र भारती म्हणाले की, मी खूप आनंदी आहे, खूप भारावून गेलो आहे. हा क्षण माझ्या आयुष्यात शुभसंकेत म्हणून आला आहे. 1990 मध्ये मी संकल्प केला होता की प्रभू श्री रामाचे मंदिर बांधले जाईल तेव्हाच मी लग्न करेन आणि भव्य मंदिरात त्यांचे दर्शन घेईन. माझी इच्छा पूर्ण झाली आहे.