नव्याने बांधण्यात येत असलेल्या अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येमध्ये अनेक बदल घडून येत आहेत. अयोध्येत राम मंदिरासोबतच आणखी १८ मंदिरंही बांधण्यात येत आहेत. दरम्यान, २२ जानेवारी २०२५ रोजी अयोध्येत पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रंगणार आहे. त्यावेळी अयोध्येत नेमकं काय घडणार आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे.
अयोध्येतील राम मंदिरामधील पहिल्या टप्प्यातील बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. राम मंदिरातील दुसऱ्या मजल्यावर राम दरभाराची स्थापना होणार आहे. एवढंच नाही तर राम दरबारातील मूर्तींची निर्मिती ही पांढऱ्या संगमरवराच्या दगडामध्ये राजस्थानमधील जयपूर येथे करण्यात येत आहे. राम दरबारातील मूर्तींची उंची सुमारे ४.५ फूट एवढी असणार आहे. त्यामध्ये श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, हनुमंत, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती असतील.
याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये २२ जानेवारी रोजी पुन्हा एकदा राम मंदिरातील राम दरबारामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंदिर निर्माण समितीच्या बैठकीमध्ये राम मंदिराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मूद्द्यांवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वात प्रमुख अशा राम मंदिरामध्ये बनणाऱ्या राम दरबारातील प्रतिमा आणि त्यांच्या स्थापनेबाबत चर्चा झाली आहे.
याबाबत राम मंदिर निर्मिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिरामध्ये इतरही काही मंदिरांचं बांधकाम सुरू आहे. तसेच राम दरबारातील मूर्तींची निर्मिती वेगाने सुरू आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर राम मंदिर ट्रस्ट राम दरबारातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना कधी करायची, याबाबतचा निर्णय घेणार आहे. मात्र जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिरातील राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल.