नवी दिल्ली - हिंदुत्ववादी संघटनांनी आणि साधू संतांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली असून, अयोध्येतील विवादित भूमी ही बौद्ध तीर्थक्षेत्र असल्याचा दावा आठवले यांनी केला आहे. तसेच हिंदु आणि मुस्लिमांनी अयोध्येतील जमिनीच्या वादावरून हिंसाचार न करता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची वाट पाहावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर लिहिण्यात आलेल्या 'मुसलमान और योदी आदित्यनाथ' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आठवले यांनी हे वक्तव्य केले. तसेच काही मुस्लिमांना गोरक्षेच्या नावाखाली अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. मात्र असे असले तरी गाय ही हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असल्याने मुस्लिमांनीसुद्धा गोरक्षेसाठी प्रयत्न करावेत असा सल्ला आठवले यांनी दिला. तसेच योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमविरोधी नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अयोद्धेतील विवादित जमीन बौद्ध तीर्थक्षेत्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 12:21 PM