अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहीमेमध्ये मुस्लिम देखील मागे राहीलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून १२ हजार, तर शाह बानो यांच्याकडून ११ हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे.
बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचं स्वागत केलं आहे. "राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केलं तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढवण्याचं संपूर्ण देशात प्रतिक ठरेल", असं अन्सारी म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल सिंह यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक मुस्लिम नागरिकही पुढाकार घेऊन देणगी देत असल्याचं म्हटलं आहे. तर स्थानिक मौलवी सिराजुद्दीन यांनीही हिंदू बांधवांच्या या आनंदाच्या क्षणात मुस्लिम बांधवांनीही सामील व्हायला हवं, असं म्हटलं आहे. "हिंदूंच्या विश्वासाचा सन्मान करायला हवा, दानही करायला हवं. मग तो फक्त एक रुपया का असेना. सर्वधर्मियांनी या मंदिरासाठी दान करायला हवं", असं सिराजुद्दीन म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सय्यद ताहीर यांनीही मुस्लिम बांधवांना राम मंदिरासाठी देणगी देण्याचं आवाहन केलं आहे. "विश्व हिंदू परिषदेच्या विचारधारेशी सहमती नसली तरी प्रभू श्री रामाप्रती हिंदूंच्या असलेल्या आस्थेचा सन्मान करुन मुस्लिमांनीही देणगी द्यायला हवी", असं सय्यद ताहीर म्हणाले.