नवी दिल्ली : देशात आता कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. सध्या देशातील बर्याच राज्यांमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. मात्र, लवकरच देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाने मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
यानुसार, जर मुलांना 4 ते 5 दिवसापर्यंत जास्त ताप येत असेल, जेवण कमी करत असतील किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर लोकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुलांमधील ऑक्सिजनची पातळी जरी 95 च्या खाली गेली असली तरी त्यांना वृद्धांपासून दूर ठेवले पाहिजे. कोरोना लक्षणे नसलेली मुले वृद्ध लोकांसाठी समस्या निर्माण करु शकतात.
मार्गदर्शक सूचनांनुसार, मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना दुधात हळद मिसळून दिले पाहिजे. यासह त्यांना च्यवनप्राश द्या. आयुष बाल क्वाथ देऊ शकता. लक्षणांनुसार कोरोना बाधित मुलांनाही विविध आयुर्वेदिक औषधे दिली जाऊ शकतात. मात्र, यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे बंधनकारक आहे. मुलांमध्ये पोषण वाढविण्यासाठी, त्यांना हिरव्या भाज्या आणि फळे खाण्यास द्या.
ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मुलांना पिण्यास कोमट पाणी द्या. मुलांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांना सकाळी आणि रात्री दात घासणे (ब्रश करणे) आवश्यक आहे. जर मुल पाच वर्षांपेक्षा मोठे असेल तर त्याला कोमट पाण्याने गुळण्या केल्या पाहिजे. तसेच, तेलाने मुलांची मालिश करा आणि आपल्या मुलांना योगा करण्यास सांगा.
आयुष मंत्रालयाने या मार्गदर्शक सूचनांमध्ये इशारा दिला आहे की, लठ्ठपणा, टाइप -१ मधुमेह, हृदय, फुफ्फुसे आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांना कोरोना साथीच्या तिसर्या लाटेचा सर्वाधिक धोका असू शकतो.