नवी दिल्ली : भारत सरकारच्या 'आयुष्मान भारत योजने' या आरोग्य योजनेतील प्रमुख त्रुटी समोर आल्या आहेत. सरकारी खर्चाचा हिशोब करणाऱ्या 'भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक' (कॅग) संस्थेने या योजनेतील अनियमितता समोर आणला आहे. कॅगने आपल्या अहवालात सांगितले आहे की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे ७.५ लाख लोकांनी फक्त एका फोन नंबरवर रजिस्ट्रेशन केले आहे. याशिवाय, आणखी एक फोन नंबर आहे, ज्यावर १.३९ लाख रजिस्ट्रेशन झाले आहे.
या योजनेंतर्गत अशा अनेक लोकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, जे रजिस्ट्रेशनसाठी पात्र नाहीत, असेही अहवालात समोर आले आहे. या योजनेचा लाभही या लोकांनी घेतला आहे. रजिस्ट्रेशनसाठी पात्र नसलेल्या लोकांनी २२ कोटी रुपयांचा फायदा घेतल्याचे कॅगच्या अहवालात सांगण्यात आले आहे. ज्या ७.५ लाख लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन ९९९९९९९९९९ या क्रमांकावरून करण्यात आली. कॅगशी संबंधित एक अहवाल मंगळवारी संसदेत ठेवण्यात आला, ज्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.
एवढेच नाही तर आयुष्मान योजनेशी संबंधित रुग्णालयांच्या दर्जावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांकडून वेगळे पैसेही गोळा करण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. २०१७ ते २०२१ या काळात केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत २१०३ लाभार्थींचा मृत्यू झाला होता, मात्र तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळत होता. छत्तीसगड, हरयाणा, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेश ही अशी राज्ये आहेत, जिथे अशा प्रकरणांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे.
काय आहे आयुष्मान योजना?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी झारखंडची राजधानी रांची येथे आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला होता. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत १२ कोटी गरीब कुटुंबे येतात, ज्यांची लोकसंख्या सुमारे ५५ कोटी आहे. अशा प्रकारे आयुष्मान योजनेत देशाच्या ४० टक्के लोकसंख्येचा समावेश होतो.