आयुष्यमान भारत योजना देशाची फसवणूक, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:03 AM2019-03-21T05:03:35+5:302019-03-21T05:05:07+5:30
मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे.
नवी दिल्ली - मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने ही योजना आखली आहे. ५0 कोटी लाभार्थ्यांसह ही जगातील सर्वांत मोठी योजना असल्याचा दावा खोटा आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली होती. यात २.३ कोटी परिवारांना सामावून घेण्यात आले होते. हीच योजना आता ज्योतिबा फुले यांच्या नावे चालविली जाते. पीएमजेएवाय योजनेत यातील ८४ लाख लोकांनाच सामावून घेण्यात आले. विमा संरक्षण असलेल्यांना २२ टक्केच प्रीमियम देण्यात आला आहे.
काँग्रेसने म्हटले की, मोदी केअरच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या पीएमजेएवाय योजनेत खाजगी रुग्णालयांनी घोटाळा केल्यास केवळ संलग्नता रद्द करण्याची शिक्षा ठेवण्यात आली आहे. ज्या खाजगी रुग्णालयांना सरकार लाभ मिळवून देऊ इच्छिते त्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी घोटाळ्याला किरकोळ शिक्षा ठेवली गेली आहे.
काँग्रेसने म्हटले की, या योजनेची आकडेवारी लपवून ठेवण्यासाठी या योजनेला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. योजनेत सहभागी खाजगी रुग्णालये आणि खाजगी विमा कंपन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या अटी व शर्तींचे दस्तावेज काँग्रेसने पत्रकारांना सादर केले आहेत.