नवी दिल्ली : ७० वर्षांहून अधिक वयाच्या सर्वच नागरिकांसाठी माेफत आराेग्यविषयक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असतानाच आयुष्मान भारत पंतप्रधान जनआराेग्य याेजनेत ज्येष्ठांसाठी आराेग्यविषयक आणखी पॅकेज जाेडण्याबाबत विचार सुरू आहे. सूत्रांनुसार, ही सुधारित योजना या महिनाअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ साडेचार कोटी कुटुंबातील सहा कोटी नागरिकांना होऊ शकेल.
आरोग्य सुविधांविषयी दिल्या जाणाऱ्या निधीबाबत निर्णय घेणारी समिती सध्या वृद्धावस्थेतील देखभालविषयक गरजा लक्षात घेऊन सध्याच्या तरतुदींत आणखी वाढ करण्याचा विचार करीत आहे. सध्या या योजनेत साधारण तपासणी, शस्त्रक्रिया, कॅन्सर आणि हृदयरोगासह २७ प्रकारांतील आरोग्य सुविधांचा समावेश आहे. यात लाभार्थींना रुग्णालयांतील सुविधांसह सुटी झाल्यानंतर १५ दिवसांपर्यंत औषधी, रोगनिदानाबाबतच्या सुविधा, भोजन आणि निवास या सुविधा मोफत पुरवल्या जातात. यात आर्थिक गटाचा विचार न करता ७० वर्षांवरील सर्वच व्यक्तींसाठी या सुविधा लागू करण्यात आल्या आहेत.
२९,६४८ रुग्णालयांचा या योजनेअंतर्गत समावेश१२,९९६ खासगी रुग्णालये यात नोंदणीकृत३३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत योजना लागू
अशी मिळेल- ७० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीस अर्ज करता येईल.- यासाठी पीएमजेएवाय पोर्टल किंवा आयुष्मान ॲपवर नोंद आवश्यक.- पूर्वीचे आयुष्मान कार्ड असले तरी नव्या कार्डसाठी अर्ज करावा लागेल.