नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी आयुष्यमान योजनेचा उद्या शंख फुंकला जाणार असून जगातील सर्वात मोठी योजना असल्याचे सांगितले जात आहे. 30 राज्यांतील 445 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात आहे. मोदी उद्या रांची येथून या योजनेचे उद्घाटन करतील.
गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी देशातील 10 कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच पुरविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे 10 हजार सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी 2.65 लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये केवळ सरकारच्या पॅनलमध्ये सहभागी झालेल्या हॉस्पिटलचा समावेश असणार आहे.
आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...
राष्ट्रीय आरोग्य संस्था ही योजना राबविणार आहे. या संस्थेच्या अधिकाऱ्यांनुसार 98 टक्के लाभार्थिंची ओळख पटविण्यात आली आहे. तसेच त्यांना योजनेचे पत्रही पाठविण्यात आले आहे. हे पत्र रुग्नाने हॉस्पिटलमध्ये दाखिवल्यास त्याची ओळख पटवून उपचार केले जाणार आहेत. आयुष्मान भारतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अरोरा यांनी सांगितले की, आम्ही गेल्या महिन्यात 26 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर काम केले. ते यशस्वी झाले. आता पर्यंत 10 हजारपेक्षा जास्त लोकांना गोल्ड कार्ड पाठविण्यात आली आहेत.
राष्ट्रीय आरोग्य संस्थेने देशभरातील हॉस्पिटल्समध्ये 14 हजार आरोग्य मित्रांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे रुग्णांची ओळख पटविणे, त्यांना उपचारादरम्यान मदत करण्याचे काम असणार आहे. लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये या आरोग्य मित्रांचे महत्वाचे काम असणार आहे. तसेच, चौकशी आणि इतर माहितीसाठी नागरिक त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.