- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे लवकरच राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील राज्यसभेच्या आठ जागांकरिता पोटनिवडणुकांची तारीख येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना महाराष्ट्र किंवा तामिळनाडूमधून पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. तामिळनाडूतील राज्यसभेच्या तीन जागांपैकी द्रमुकचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक जागा काँग्रेसला देण्याची तयारी दाखविली आहे. त्याबाबत त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. अण्णा द्रमुकचे राज्यसभेतील खासदार आर. वैतीलिंगम व केपी मुनूस्वामी यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन आमदार बनणे पसंत केले, तर तिसरी जागा खासदार ए. मोहम्मदजान यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झाली होती. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. ही जागा यापुढेही काँग्रेसकडेच राहाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कठोर टीकाकार व माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांना तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर पाठविण्याचे संकेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. ममता बॅनर्जी यांना आता राष्ट्रीय राजकारणामध्येही स्वत:चा दबदबा वाढवायचा असून, त्या योजनेला अनुरूप अशा व्यक्तींनाच त्या राज्यसभेवर धाडणार आहेत. पश्चिम बंगालमधून मुकुल रॉय किंवा निवडणूक प्रचारनीतीचे जाणकार प्रशांत किशोर यांनाही ममता बॅनर्जी राज्यसभेवर निवडून आणतील अशी चर्चा आहे.
ममता बॅनर्जी यांच्या निर्णयांकडे लक्ष तृणमूलचे डेरेक ओब्रायन सध्या यशवंंत सिन्हा यांची ट्विट रिट्विट करत आहेत हेही लक्षणीय आहे. तृणमूलचे दिनेश त्रिवेदी भाजपमध्ये गेल्याने व डॉ. मानस भुयान राज्यमंत्री बनल्याने पश्चिम बंगालमधील एकूण दोन जागा रिक्त झाल्या. आसाममध्ये भाजपच्या विश्वजीत दायमरी व केरळचे जोस मणी यांनी आमदार बनण्यासाठी राज्यसभेचा राजीनामा दिला. दायमरी यांच्या जागी राज्यसभेवर सर्वानंद सोनोवाल यांना निवडून आणले जाण्याची शक्यता आहे.