जम्मू: काश्मिरी सफरचंदांवर असलेल्या मजकुरामुळे एकच खळबळ माजली आहे. काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांची खोकी उघडताच त्यावरील मजकूर विक्रेत्यांच्या दृष्टीस पडले. यानंतर सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा इशारा फळ विक्रेत्यांनी दिला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांविरोधात जम्मूत निदर्शनंदेखील झाली आहेत.काश्मीरमधून जम्मूतील फळांच्या मंडईत आलेल्या सफरचंदांवर 'आम्हाला स्वातंत्र्य हवंय', 'आम्ही बुरहान वाणीवर प्रेम करतो', 'झाकीर मुसा परत ये', असा मजकूर आहे. या प्रकरणी सरकारनं कारवाई न केल्यास काश्मीरमधून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार घालू, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे. सफरचंदांवर लिहिण्यात आलेल्या मजकुरामुळे विक्रेत्यांनी त्यांची खरेदी करण्यासदेखील नकार दिला आहे. काश्मीरमधून येणारी सफरचंद जम्मूतील घाऊक विक्रेत्यांनी खरेदी केली. त्यानंतर या सफरचंदांची खोकी विक्रेत्यांकडे आली. त्यावेळी त्यांना सफरचंदांवर काळ्या मार्करनं लिहिलेला मजकूर दिसला. यानंतर कठुआमधील विक्रेत्यांनी आंदोलन करत पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात घोषणा दिल्या. पोलीस आणि सरकारनं या प्रकरणात लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी यावेळी केली. सध्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक माजिद यांनी दिली.
काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवरील 'त्या' मजकुरानं एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 8:09 PM