नवी दिल्ली : दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाने ८७ कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणल्याचा आरोप करताना भाजपचे ज्येष्ठ खासदार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी रविवारी भरगच्च पत्रपरिषदेत तुफान टोलेबाजी करीत अप्रत्यक्षरीत्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनाच जबाबदार धरले, मात्र माझी लढाई क्रिकेटमधील भ्रष्टाचाराशी असून जेटलींशी नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मन वळविण्यासाठी स्वत: चर्चा करूनही आझाद ठरल्याप्रमाणे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी आधीच रविवारी पत्रपरिषदेत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे प्रेस क्लब आॅफ इंडिया येथे पत्रकारांनी खच्चून गर्दी केली होती. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि माजी क्रिकेटपटू सुरेंद्र खन्ना यांच्या उपस्थितीत त्यांनी डीडीसीएतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी या लढाईला राजकीय रंग दिला जाऊ नये असे स्पष्ट केले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप मोठा प्रशंसक असून भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईत मी त्यांचा साथीदार आहे. माझी ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरुद्ध नसून दिल्लीच्या क्रिकेट संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे.आझाद यांनी विकिलिक्स फॉर इंडिया आणि सनस्टार वृत्तपत्राने केलेल्या तपासावर आधारित २८ मिनिटांचा व्हिडिओ जारी केला. डीसीसीएच्या वार्षिक बैठकीची ११ मिनिटांची सीडीही त्यांनी दाखविली. त्यात कीर्ती आझाद आणि एनसीटीचे सचिव समीर बहादूर आणि तत्कालीन अध्यक्ष जेटली भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा करताना दाखविले आहे. ही सीडी ३० डिसेंबर २०१२ रोजीची आहे. ती एकूण ४२ मिनिटांची असली तरी त्यात ११ मिनिटांचे अंश दाखविण्यात आले आहे .(लोकमत न्यूज नेटवर्क)
जेटलींना न दुखवता आझादची टोलेबाजी
By admin | Published: December 21, 2015 2:24 AM