- आदेश रावलनवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांना गुलाम नबी आझाद यांच्यासोबतची बैठक महागात पडू शकते. काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करणाऱ्यांना हुड्डा का भेटत आहेत, हे त्यांना नोटीस पाठवून विचारा, अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा यांनी पक्षाचे राज्य प्रभारी विवेक बंसल यांना पाठवले आहे.आझाद हे राहुल गांधी व त्यांच्या संपूर्ण टीमवर हल्लाबोल करत असताना भूपेंद्रसिंह हुड्डा, आनंद शर्मा व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत आझाद यांची भेट घेतली होती. आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना राहुल गांधी आणि त्यांच्या टीममुळे पक्षाचे हे हाल झाल्याचे म्हटले होते. कुमारी शैलजा यांच्या पत्राबाबत बोलताना हुड्डा म्हणाले की, आपण नरसिंहरावांपासून आजपर्यंत सोनिया गांधी यांच्यासोबत उभे आहोत. आम्हाला कोणाकडून निष्ठावान असल्याचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही.