नवी दिल्ली : भाजपच्या खासदार रमादेवी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उद्गार काढल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी अखेर लोकसभेत सोमवारी माफी मागितली आहे. तिहेरी तलाक विधेयकाच्या मुद्द्यावर गुरुवारी लोकसभेत चर्चा सुरू असताना पीठासीन अधिकारी रमादेवी यांच्याबद्दल आझम खान यांनी अत्यंत गलिच्छ उद्गार काढले. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता.
आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी अनेक पक्षांच्या खासदारांनी केली होती. आझम खान यांनी माफी मागावी असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच त्यांना सांगितले. त्यावेळी आझम खान म्हणाले की, मी नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो होतो. राज्यसभेचाही सदस्य होतो. त्यामुळे संसदीय कामकाज कसे चालते याचा मला जाण आहे. कोणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नव्हता. तरी देखील माझ्याकडून चूक झाली असे कोणाला वाटत असेल तर मी माफी मागतो. मात्र त्यांचे काही शब्द स्पष्टपणे ऐकू न आल्याने त्यांची माफीचा पुनरुच्चार करावा अशी मागणी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. त्याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विरोध केला. मात्र जोशी यांची मागणी मान्य करून लोकसभा अध्यक्षांनी आझम खान यांना माफीचा पुनरुच्चार करायला लावला.
गलिच्छ शेरेबाजी करण्याची आझमखान यांना सवय : रमादेवीमहिलांबद्दल गलिच्छ शेरेबाजी करण्याची आझम खान यांना सवयच आहे असा टोला भाजप खासदार रमादेवी यांनी त्यांना लोकसभेतच लगावला. त्या म्हणाल्या की, सभागृहाबाहेर महिलांबाबत गलिच्छ उद्गार काढण्याचे प्रकार आझम खान यांच्याकडून अनेकदा घडले आहेत. यावेळी फरक इतकाच की त्यांनी ती कृती लोकसभेत केली. आझम खान यांनी काढलेल्या उद्गारांमुळे सर्वांनाच वेदना झाल्या. अशी घाणेरडी वक्तव्ये ऐकण्यासाठी आपण सभागृहात येत नाही असेही रमादेवी यांनी आझम खान यांना सुनावले.