नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान (Azam Khan) यांना सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असताना आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता आझम खान यांची प्रकृती आणखी जास्त चिंताजनक झाली आहे. त्यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आझम खान यांना दर मिनिटाला तब्बल 10 लीटर ऑक्सिजनची गरज भासत आहे.
मेदांता रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर टीमने आझम खान यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना कोविड आयसीयूमध्ये शिफ्ट केलं आहे. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाह यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम खान खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.
सुरुवातीला केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये कोरोनाचं मॉडरेट इंफेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याचं देखील राकेश कपूर यांनी सांगितलं. तसेच त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी आझम खान यांच्या मुलाच्या प्रकृती विषयी देखील माहिती दिली आहे. मोहम्मद अब्दुल्लाह खान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली; तुरुंगातून रुग्णालयात दाखल
रविवारी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आझम खान आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात ते कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खान यांच्यासोबतच तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आझम खान आणि त्यांच्या मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.