गेल्या आठवड्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी मंत्री आझम खान यांच्या रामपूर येथील निवासस्थानासह अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. ही कारवाई तीन दिवस सुरू होती. हा छापा आझम खान यांच्या मोहम्मद अली जौहर ट्रस्टशी संबंधित होता. आयटी टीम त्यांच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी करत आहे. याच दरम्यान सपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना दिसले. "ते या देशातील सर्वात मोठे व्यक्ती आहेत" असंही ते म्हणाले.
रविवारी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. अशा परिस्थितीत आझम खान यांना पंतप्रधानांच्या वाढदिवसाविषयी विचारलं असता ते म्हणाले, "या दिवशी ते शांततेने हा देश चालवतील. प्रेम आणि आपुलकी प्रस्थापित करतील... द्वेष संपवतील... सत्तेत असो वा नसो... आपलं नाव जिवंत ठेवण्यासाठी ते असं काही करतील जे याआधी कोणीच केलं नसेल. चांगल्यासाठी ते असेल, आम्हाला अशी आशा आहे. त्यांनी असंच करायला हवं कारण ते या देशाचे सर्वात मोठे व्यक्ती आहेत."
यावेळी आझम खान यांनी त्यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याबद्दल सांगितलं, "जेव्हा आयटीचे लोक आले, तेव्हा पहिल्या दिवसापासून सगळे म्हणू लागले की काहीही सापडणार नाही. माझ्या धाकट्या मुलाकडे नऊ हजार रुपये, मोठ्या मुलाकडे दोन हजार रुपये होते आणि माझ्याकडे साडेतीन हजार रुपये होते, माझ्या पत्नीकडे फक्त शंभर ग्रॅमचे दागिने होते, ज्याची किंमत चार लाख आहे, हे सर्व तिथे होतं."
आझम खान म्हणाले की, घाबरलेली लोकशाही धोकादायक आहे. सरकार अनर्थाकडे जात आहे. सपा नेत्याने आपल्या शैलीत प्रत्युत्तर देत विचारलं, "आम्ही चोर आहोत, अजून किती दिवस जगू. ही टाटा बिर्ला संस्था नाही, हे एक मिशन आहे. इथे गरीब मुलं त्यांची फी भरून शिक्षण घेतात. संपूर्ण जगात अशी काही उदाहरणं आहेत का जिथे कोणत्याही शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला असेल?" एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.