बंगळुरू : आयटी क्षेत्रातील विप्रो लिमिटेड या प्रख्यात कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे त्यांच्या मालकीचे आणखी तब्बल ५२ हजार ७५० कोटी रुपयांचे शेअर धर्मादाय कामासाठी दान करण्याचे ठरविले आहे.प्रेमजी यांच्या दानातून धर्मादाय कामे करणाऱ्या अझीम प्रेमजी फाउंडेशनने बुधवारी ही माहिती देताना निवेदनात म्हटले, की अझीम प्रेमजी यांच्या या नव्या दानामुळे फाउंडेशनच्या गंगाजळीत त्यांचे एकूण योगदान आता १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशा प्रकारे प्रेमजी यांनी विप्रो कंपनीची त्यांच्याकडे असलेली ७३ टक्के मालकी धर्मादाय कामांकडे वळविली आहे.अझीम प्रेमजी फाउंडेशन बहुवार्षिक अनुदान देऊन शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणी ते उपलब्ध करण्याचे व असलेल्या सोयी अधिक सुधारण्याचे काम करते. सध्या देशाच्या १० राज्यांमध्ये फाउंडेशनचे हे काम सुरू आहे. या नव्या निधीमुळे बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अधिक विस्तार करून पाच हजार अधिक विद्यार्थी व ४०० नव्या अध्यापकांची तेथे सोय करता येईल. याखेरीज समाजातील शोषित वर्गांसाठी काम करणाऱ्या सुमारे १५० स्वयंसेवी संस्थांनाही हे फाउंडेशन मदत करते. (वृत्तसंस्था)
अझीम प्रेमजींनी धर्मादाय निधीत दिले ५२ हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:34 AM