ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - सामाजिक कार्यकर्ते बी. विल्सन आणि संगीतकार टी.एम.कृष्णा या दोन भारतीयांना आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा २०१६ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान या दोन भारतीयांशिवाय काँचिटा कॅप्रिओ-मॉरेल्स, डॉम्पेट धौफा या दोघांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कर्नाटकातील एका दलित कुटुंबात जन्माला आलेले बी. विल्सन हे एक सामाजिक कार्यकर्ते असून मानवी हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर चेन्नईत जन्मलेले संगीतकार टी.एम.कृष्णा यांना संगीतात सर्व संस्कृतींचा समावेश करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
आशियाचा ‘नोबेल’ म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशन (आरएमएएफ)च्या विश्वस्त बोर्डाने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली. यापूर्वी सामाजिक कार्य करणा-या भारतातील अनेक नामवंत व्यक्तींना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, नीलिमा मिश्रा यांसारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला होता.