Bageshwar Dham : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी गुरुवारी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले आणि विविध संतांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी 'आज तक'शी बातचीत करताना त्यांच्या चमत्काराविषयी खुलासा केला. धीरेंद्र शास्त्री लोकांविषयी माहिती देतात, त्यावरुन ते चर्चेत आले आहेत.
यावेळी पत्रकारांनी त्यांना भविष्य सांगणे ही कला आहे की शक्ती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, 'हा चमत्कार नसून, ही सिद्धी आहे.' ते पुढे म्हणतात, 'प्रयागराजमध्ये येऊन गंगेत स्नान करणे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. संत समाजाची वाटचाल आता हिंदू समाजाकडे होत आहे.' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, 'मी राजकीय व्यक्ती नाही, त्यांना भेटण्याचा कोणताही विचार नाही.'
'रामचरितमानसला विरोध करणारे कॅन्सर रुग्ण'यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी रामचरितमानसच्या निषेधावरही प्रतिक्रिया दिली. 'रामचरितमानसचे दहन आणि त्याचा निषेध करणारे कर्करोगाचे रुग्ण आहेत, त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. आपण सगळे एकत्र राहिलो, तर भारत हिंदू राष्ट्र होईल. भारताची वाटचाल हिंदू राष्ट्राकडे होत आहे.' धीरेंद्र शास्त्री यांनी आज प्रयागराजमध्ये पवित्र स्नानानंतर माघे मेळ्यात संतांची भेट घेतली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य स्वामी वायुदेवानंद यांच्या शिबिरालाही भेट देणार आहेत.
धीरेंद्र शास्त्री प्रसिद्धीच्या झोतात कसे आले?महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादूटोण्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केल्यापासून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे चर्चेत आले आहेत. समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दावा केला होता की, धीरेंद्र शास्त्री 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली 'जादूटोणा'ला प्रोत्साहन देतात.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी दावा केला होता की, ते कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाहीत किंवा ते कोणाचेही प्रश्न सोडवत नाहीत. 'हत्ती बाजारात जातो, हजारो कुत्रे भुंकतात' असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्याची देशभरात चर्चा सुरू झाली. काही लोक याला श्रद्धेचा मुद्दा म्हणत आहेत, तर काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत आहेत.