बाबा बागेश्वर यांच्या अनुयायानं गुगल, यूट्यूब अन् X चं टेन्शन वाढवलं, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:48 PM2023-12-06T19:48:08+5:302023-12-06T19:48:49+5:30
ही याचिका रंजीत पटेल यांनी दाखल केली होती. रंजीत हे नरसिंहपूर गोटेगाव येथील रहिवासी आहेत.
केवळ मध्य प्रदेशच नाही तर देश-विदेशातही प्रसिद्ध असलेले कथा वाचक, तसेच बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेले वादग्रस्त व्हिडिओ आणि कमेन्टसंदर्भात जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका त्यांचे आनुयायी रंजीत पटेल यांनी दाखल केली होती. रंजीत हे नरसिंहपूर गोटेगाव येथील रहिवासी आहेत.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या संजय दुबे यांच्या एकल खंडपीठाने गुगल, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला वादग्रस्त व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले असून नोटीस बजावत दोन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.
वादग्रस्त व्हिडिओ हटविण्याचे निर्देश -
संबंधित व्हिडिओमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. कारण शास्त्रानुसार, गुरूला ईश्वराचा दर्जा देण्यात आला आहे आणि त्यांच्या गुरू विरोधात सोशल मीडियावर चुकीचा कंटेन्ट चालविला जात आहे. जबलपूर उच्च न्यायालयाने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करत फेसबुक, ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना बागेश्वर धाम पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधातील वादग्रस्त व्हिडिओ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण -
खरे तर, भाजपचे माजी आमदार आरडी प्रजापती ओबीसी महासभेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना, मी बाबा धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान देतो की, त्यांनी माझे भूत उतरवून दाखवावे, असे आरडी प्रजापती यांनी अपशब्द वापरत म्हटले आहे. यानंतर हे प्रकरण तापले होते.