नवी दिल्ली - सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून "बाबा का ढाबा" हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये बाबा का ढाबा चालवणाऱ्या आजोबांचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्लीतील 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगलंच उचलून धरलं. त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच दिसला. एकेकाळी बाबाच्या ढाब्यावर कोणी फिरकतही नव्हतं. मात्र अचानक सोशल मीडियाच्या कमालीमुळे या आजोबांच्या ढाब्यावर खवय्यांची गर्दी झाली आहे. मात्र आता "बाबा का ढाबा"ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या, त्याचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
"बाबा का ढाबा"चे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी ट्यूबर गौरव वासन (Gaurav Wasan) विरोधात तक्रार दाखल केली आहे. ढाब्याच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये अफरातफर केली गेली असल्याचं म्हटलं जात आहे. गौरव वासन याने सर्वप्रथम या बाबांचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रचंड लोकप्रिय झाला आणि लोकांनी वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
गौरव वासनने बाबा का ढाबाच्या मदतीसाठी ऑनलाईन कॅम्पेन चालवून पैसे गोळा केले पण सर्व पैसे कांता प्रसाद यांना दिलेच नाही. हे पैसै गौरव वासन आणि त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा होत होते अशी माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर आता कांता प्रसाद यांनी यूट्यूबर गौरव वासनविरोधात मालवीयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील तक्रार मिळाली असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आजोबांच्या मदतीसाठी अनेकांचा पुढाकार
दिल्लीतील मालविया नगरमध्ये 80 वर्षीय आजोबांनी 'बाबा का ढाबा' सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करू शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं होतं. लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आता अनेकांनी आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
अभिनेत्री रविना टंडननेही हा व्हिडीओ शेअर केला होता. शेअर करत चाहत्यांनाही 'बाबा का ढाबा'ला एकदा तरी भेट देण्याचे आवाहन केले होते. रवीनाप्रमाणे सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी हे कलाकारदेखील 'बाबा का ढाबा'च्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.