नवी दिल्ली - शहरातील मदनगीर परिसरातील एका नवरदेवावर त्याच्या लग्नाच्या वरातीतच गोळीबार करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. विवाहस्थळापासून 500 मीटर अंतरावर असताना 25 वर्षीय नवरदेव बादल याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गोळी त्याच्या खांद्याला लागली. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. विशेष म्हणजे 4 तासातच उपचार घेऊन नवरदेव बोहल्यावर चढला.
खानापूर येथील रहिवासी असलेल्या बादलच्या लग्नाची वरात निघाली होती. त्यावेळी मदनगीर परिसरात वरात येताच दुचाकीवर आलेल्या दोघांनी बादलवर गोळीबार केला. त्यामध्ये गोळी बादलच्या खांद्याला लागल्याने त्यास जखम झाली. पण, वरातीतील ढोल-ताशांच्या आवाजामुळे गोळीचा आवाज मित्र किंवा वऱ्हाडी मंडळींना ऐकू आलाच नाही. त्यामुळे नवरदेव बादलने स्वत:च बग्गीतून खाली उतरून नाचणाऱ्या वऱ्हाडींना गोळी लागल्याचं निदर्शनास आणून दिले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला तात्काळ शेजारील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आपल्या खांद्यातील गोळी काढून म्हणजेच 3 तासांच्या उपचारानंतर बादल पुन्हा लग्नमंडपात हजर झाले. विशेष म्हणजे त्यांनी नियोजितपणे लग्नसोहळा पार पाडला. तर, उर्वरीत सर्जरी आपण लग्नानंतर करणार असल्याचं बादल यांनी म्हटले. बादल यांच्या या निर्णयाची परसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.