चंदिगड, दि. 28 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राम रहीम याला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायलयाने सुनावली असल्याचे सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी सांगितले. याचबरोबर, राम रहीमला न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमधे प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या दंडाच्या रकमेतील दोन्ही पीडितांना प्रत्येकी 14 लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता.
निकाल वाचनास सुरुवात करण्याआधी युक्तिवादासाठी न्यायालयाने दोन्ही पक्षांना 10 मिनिटांचा वेळ दिला होता. सीबीआयने किमान दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. तर बचावपक्षाच्या वकिलांनी सामाजिक कार्य लक्षात घेता कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केला होता.
डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंचकुला, सिरसा, मनेसर या शहरात लष्करास पाचारण करण्यात आले आहे. ज्या तुरुंगात शिक्षा सुनावण्यात येणार आहे तो सुनारिया तुरुंग रोहतक शहराच्या बाहेरच्या भागात आहे. रोहतकमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. डेराच्या राज्यातील प्रमुख पदाधिका-यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बाबा गुरमीत राम रहीमला साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याला कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता अशी माहिती समोर आली आहे. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत.