हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला असतानाच बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बाबा गुरमीत राम रहीम याने पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केला आहे. राम रहीम याने २० दिवसांच्या पॅरोलची मागणी केली आहे. आता सरकारने राम रहीमचा पॅरोलवरील सुटकेच्या मागणीसाठी केलेला अर्ज हरियाणाच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसर यांच्याकडे पाठवला आहे. तसेच आता बाबा राम रहीमच्या पॅरोल अर्जाच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
आता हरियाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आता तुरुंग विभागाकडे अर्जाच्या मागची आकस्मिक कारणं सांगण्यास सांगितली आहेत. डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम याची पॅरोलवर मुक्तता करण्यासाठी काही आपातकालीन परिस्थिती आहे का अशी विचारणा त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नियमानुसार निवडणुकीदरम्यान, जर कुठल्या कैद्याची आपातकालीन परिस्थितीत पॅरोलवर सुटका करायची असेल तर त्यासाठी मुख्य निवडणूक पदाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता असते.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निडणुकीदरम्यान डेरा प्रमुख असलेल्या राम रहिमकडून अकराव्यांदा पॅरोलची मागणी का करण्यात आली, असा प्रश्न निवडणूक आयोगाप्रमाणेच सर्वसामान्यांना पडला आहे. तर डेराच्या प्रवक्त्यांनी मात्र या पॅरोलच्या मागणीचा बचाव केला आहे. या प्रवक्त्याने सांगितले की, गुरमीत राम रहीम हे एका वर्षामध्ये ९१ दिवसांच्या पॅरोलचा हक्कदार आहेत. त्यामुळे त्यांनी २० दिवसांच्या पॅरोलची केलेली मागणी ही कायद्याला धरून आहे.
डेरा सच्चा प्रमुख गुरमीत राम रहीम हा आतापर्यंत १० वेळा पॅरोल आणि फर्लोच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर आलेला आहे. राम रहीम याला २०१७ मध्ये २० वर्षांची शिक्षा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राम रहिम हा २५५ दिवस म्हणजेच ८ महिन्यांहून अधिक काळ पॅरोल आणि फर्लो सुट्ट्यांच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर राहिला आहे.