पंचकुला, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंजाब, हरियाणामध्ये समर्थकांनी आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून यामध्ये आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 250 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना सेक्टर 6 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.
बाबा गुरमीत राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन्स फोडल्या. सुरक्षापथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडयाही फोडाल्या. पंजाबमध्ये मुक्तसर, भटिंडा आणि मानसा येथे संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
पंचकुलामध्ये जमावाने सुरक्षापथकांवरच हल्ला केला. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना तेथे हवेत गोळीबारही करावा लागला. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना मागे हटावे लागले. गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक गाडयांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानके जाळून टाकल्याचे वृत्त आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकडया आणि हरयाणा पोलिस दलाचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले होते तसेच पंजाब, हरयाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये 72 तासांठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.
न्यायालयात आज राम रहिम यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल सुनावला जाणार असल्याने हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खबरदारी म्हणून पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. पंजाब व हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. सिरसाजवळच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंचकुलात सीआरपीएफचे जवान तैनात आहेत.जाणून घेऊ राम रहीमविषयी-गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.
कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम-15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.