सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी पतंजली आयुर्वेदला फटकारले होते आणि योग गुरू बाबा रामदेव तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हजर होण्यास सांगितले होते. हे दोघेही आज सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर दोघांनीही न्यायालयाकडे बीनशर्त माफी मागितली.
सुनावणी दरम्यान, बाबा रामदेव यांचे वकील म्हणाले, अशा जाहिरातीसाठी आम्ही माफी मागतो. आपल्या आदेशानंतर, स्वतः योग गुरू बाबा रामदेव न्यायालयात आले आहेत. ते माफी मागत आहेत आणि आपण त्यांची माफी रिकॉर्डमध्ये घेऊ शकता.
बाबा रामदेवांचे वकील म्हणाले, 'आम्ही न्यायालयापासून पळत नाही. मी हे काही पॅराग्राफ वाचू शकतो? मी हाथ जोडून असे म्हणू शकतो का, की जेन्टलमन स्वतः न्यायालयात हजर आहेत आणि न्यायालय त्यांची माफी नोंदवू शकते?' सुनावणी वेळी पतंजलीचे वकील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात बोलताना म्हणाले, आमच्या माध्यम विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात गेली. यावर, यासंदर्भात आपल्याला माहिती नव्हती असे गृहित धरणे अवघड आहे, असे न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पिठाने म्हटले आहे.
तत्पूर्वी, पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती मागे घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्येच दिले होते. तसेच, जर असे झाले नाही, तर आम्ही पुन्हा अॅक्शन घेऊ. अशा स्थितीत पतंजलीच्या प्रत्येक जाहिरातीवर 1 कोटी रुपये एवढा दंड लावला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले होते.