योगगुरू बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत "आपल्याकडे ज्ञान आणि विज्ञानाचा खजिना आहे, मात्र सरसकटपणे सत्य-असत्य याचा निर्णय घेता येत नाही" असं म्हटलं आहे. मेडिकल माफिया खोटा प्रचार करतात, पतंजली कधीच खोटा प्रचार करत नाही. उलट पतंजलीने स्वदेशी चळवळीला चालना दिली. जे खोटे पसरवले जात आहे त्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे. आजारांच्या नावाखाली लोकांना घाबरवले जात आहे असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
"मी कधीही कोर्टात हजर झालो नाही. मात्र मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास तयार आहे. मला माझे संपूर्ण संशोधन सादर करण्याची परवानगी मिळावी अशी माझी इच्छा आहे. आम्हाला आमचे रुग्ण आणि संशोधन सादर करण्याची संधी दिली पाहिजे. तसेच, 1940 मध्ये जो ड्रग अँड मॅजिक रेमेडी कायदा बनवला गेला, त्यातील कमतरता समोर आणू शकतो."
"लोकांना सांगितलं जात आहे की एकदा आजारी पडलो की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात, आम्ही काय म्हणतो, औषधं सोडून नैसर्गिक जीवन जगा. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर शेकडो रुग्णांना आणायला आणि त्यावर केलेलं सर्व संशोधन देण्यास आम्ही तयार आहोत" असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
"आमच्याकडे शेकडो शास्रज्ञ आहेत, आम्ही शेकडो रिसर्च प्रोटोकॉलचं पालन केलं आहे आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत. त्यानंतर आम्ही हा दावा करत आहोत. सत्य-असत्य याचा निर्णय संपूर्ण देशासमोर व्हायला हवा. एलोपॅथी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे लाखो कोटींचे साम्राज्य आहे. त्यामुळे असे सत्य आणि असत्य याचा निर्णय होणार नाही. त्यांच्याकडे जास्त हॉस्पिटल्स, जास्त डॉक्टर, त्यामुळे त्यांचा आवाज जास्त ऐकू येतो, कमी पैसा असणाऱ्याचा आवाज ऐकू येणार नाही."
"आमच्याकडे ऋषीमुनींच्या ज्ञानाचा वारसा आहे. पण आमची संख्या कमी आहे. आम्ही एक संस्था म्हणून संपूर्ण जगातील ड्रग माफियांशी एकहाती मुकाबला करण्यास तयार आहोत. कधीही घाबरलो नाही किंवा हरलो नाही. अंतिम निर्णय होईपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा नेहमीच आदर केला जाईल" असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे.