नवी दिल्ली - योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली'चं एक नवं 'फूड अँड आयुर्वेद पार्क' दिल्ली- एनसीआरमध्ये उभं राहत आहे. वेळेपूर्वीच कंपनीकडून जमिनीचे उर्वरित 100 कोटी रुपये 'यमुना अथॉरिटी'च्या खात्यात जमा केल्यानंतर या पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 'पतंजली'चा हा फूड अँड आयुर्वेद पार्क जवळपास 430 एकर जमिनीवर उभारला जाणार आहे. यमुना अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली पतंजली कंपनीनं आयुर्वेद पार्क उभारण्यासाठी 130 एकर तसंच फूड पार्क उभारण्यासाठी 300 एकर जमीन निर्धारित केली होती.
जमीन वाटप आणि भाडेपट्टीच्या करारानुसार कंपनीला डिसेंबर 2021 पर्यंत थकीत रक्कम जमा करुन प्रकल्प प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात करायची आहे. 'पतंजली'कडून उभारलं जाणारे हे फूड अँड आयुर्वेद पार्क उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब तसेच राजस्थान या राज्यांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच या सहा राज्यांतील शेतकऱ्यांना आपल्या भाज्या आणि फळं विकण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही. सहा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लवकरच नोएडामध्ये एका छताखाली बाजार उपलब्ध होणार आहे.
पतंजली कंपनीच्या या पार्क योजनेत शेतकऱ्यांकडून फळे, भाज्या, इतर कृषी उत्पादनं तसंच औषधी वनस्पतींची खरेदी केली जाणार आहे. याचा वापर करून खाण्याचे वेगवेगळे पदार्थ तसंच औषधं निर्मितीचं काम या फूड अँड आयुर्वेद पार्कमध्ये केलं जाईल. याचा आजुबाजुच्या सहा राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असा दावा कंपनीकडून केला जात आहे. या फूड पार्कमुळे जवळपास 25 हजार रोजगार निर्मितीही होणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. 'पतंजली'कडून या योजनेसाठी जवळपास सहा कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.