मुंबई - सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ट्विटरवरुन व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये बाबा रामदेव रुग्णालयातील बेडवर पाणी पिताना दिसत आहेत. तर, बाबांच्या अवतीभोवती भक्तजणांची गर्दीही दिसून येत आहे. बाबा रामदेव यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन जर्मनी येथे करण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, स्वदेशीचे नारे देणाऱ्या बाबांनी जर्मनीत जाऊन ऑपरेशन केल्याबद्दलही बाबांवर सोशल मीडियातील या व्हायरल पोस्टनंतर टीका करण्यात आली.
सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या या फोटोसोबत अनेक कॅप्शन देण्यात आले आहेत. त्यावरुन बाबा रामदेव यांच्यावर मजेशीर कमेंटही येत आहेत. तसेच बाबा रामदेव यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपवरही चुकीचा संदेश लिहून हा मेसेज व्हायरल होत आहे. पण, वास्तविक पाहता या फोटोबाबत तपासणी केल्यानंतर, हा फोटो सन 2011 मधील असून अन्नत्याग आंदोलनातील आहे. देहरादून येथील एका रुग्णालयात बाबा रामदेव यांना दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, भक्तांकडून त्यांना पाणी पाजण्यात आले, तेव्हाचा हा फोटो आहे. भ्रष्टाचारविरोधी कायद्याची निर्मित्ती करण्याच्या मागणीसाठी बाबा रामदेव यांनी हे आंदोलन केले होते. त्यावेळी, काँग्रेस सरकार सत्तेवर होते.