मुरादाबाद: योगगुरू बाबा रामदेव यांनी मुरादाबादमध्ये झालेल्या आर्य समाजाच्या कार्यक्रमातून देशाला नशामुक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अभिनेता सलमान खान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि बॉलिवूडसह पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान जिन्ना यांच्यावरही भाष्य केले.
योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ड्रग्जने केली. ते म्हणाले की, 'मोठे सिनेस्टार ड्रग्ज घेतात. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे. शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला, तो तुरुंगातही गेला होता. सलमान खानही ड्रग्जही घेतो, आमिर घेतो की नाही हे माहीत नाही. संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे. अभिनेत्रींबद्दल काय बोलावे...'
ते पुढे म्हणाले की, 'इस्लाममध्ये दारू पिणे अपवित्र आहे. पण, जिन्ना दारू प्यायचे. इस्लाममध्ये दारूबाबत कडक नियम आहेत, त्यामुळे तिथे बिडी-सिगारेटची नशा प्रबळ झाली आहे. आज संपूर्ण देशात फक्त आर्य समाज पवित्र आहे. आर्य समाजाचे अनुयायी कोणत्याही प्रकारची नशा करत नाहीत.'
ते पुढे म्हणाले की, 'निवडणुका येताच काही राजकीय पक्ष समाजाला जाती-पातीत विभागण्याचा प्रयत्न करतात. ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम करत असतात. पण त्यांच्या उद्दिष्टात कधीच यशस्वी होणार नाहीत. फक्त आर्य समाज आहे, जो भेदभाव करत नाही. इथे सर्व जाती समान आहेत. आर्य समाज देशाला जातमुक्त आणि समान बनविण्याचे काम करत आहे.'