ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - भारतात पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेल्या बंदीचा विषय सध्या चर्चेत आहे. यावर योगगुरू बाबा रामदेव यांनीही पाकिस्तानी कलाकारांना भारतात घालण्यात आलेल्या बंदीचे समर्थन करत त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या बातमीनुसार, 'कलाकार दहशतवादी नसतात, मात्र त्यांच्यामध्ये जराही माणुसकी नाही का?, त्यांना फक्त सिनेमांद्वारे पैसा कमवायचा आणि केवळ बिर्याणी खाण्याशीच देणेघेणे आहे. पाकिस्तानी कलाकार उरी हल्ला आणि अन्य दहशतवादी हल्ल्यांचा का निषेध व्यक्त करत नाहीत?', असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर तोफ डागली आहे. दरम्यान, संधी मिळाल्यास पाकिस्तानमध्ये जाऊन योग शिकवू, तसेच पतंजलीचे यूनिटही तेथे उभारू, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
यावर अधिक स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, मात्र 'मी पाकिस्तानी कलाकारांप्रमाणे नाही करणार, तिथे पैसा कमवून भारतात नाही आणणार. पाकिस्तानातून मिळणारा पैसा तेथील लोकांवर खर्च करण्यात येईल', असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना टोमणाही हाणला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. 'वाईट गोष्टींचा नाश करणे म्हणजे हिंसा नाही. पंतप्रधान मोदी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, दहशतवादी मसूद अजहर आणि हाफिज सईद सारख्यांचाही खात्मा करतील, असे मला वाटते', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. कारण 'या वस्तूंच्या माध्यमातून चीन प्रचंड प्रमाणात पैसा कमावून पाकिस्तानला मदत करतो', त्यामुळे चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनदेखील बाबा रामदेव केले आहे.