Baba Ramdev: गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्माबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. डीएमकेचे मंत्री उदयनिधी यांनी सुरुवातीला सनातन धर्माबाबत काही विधाने केली आणि त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली. या विधानांवर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. यानंतर बिहारच्या एका मंत्र्यांनी रामचरितमानसाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. रामचरितमानस याची तुलना पोटॅशियम सायनाइडशी केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या वादात आता योगगुरू बाबा रामदेव यांनी उडी घेतल्याचे दिसत आहे.
बिहारचे मंत्री चंद्रशेखर यादव यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी रामचरितमानसची तुलना घातक पोटॅशियम सायनाइडशी केली. पंचावन्न प्रकारचे डिशेस सर्व्ह केल्यानंतर त्यात पोटॅशियम सायनाइड मिसळले तर काय होईल, हिंदू धर्मग्रंथांचीही स्थिती अशीच आहे. रामचरितमानसबद्दल माझा आक्षेप आहे आणि तो आयुष्यभर कायम राहील, असे चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. चंद्रशेखर यांनी या धार्मिक ग्रंथाचे वर्णन समाजात फूट पाडणारे आहे, असे सांगत पैगंबर मोहम्मद हे मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे चंद्रशेखर म्हणाले होते. याबाबत बाबा रामदेव यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
सनातन धर्माचा अपमान केला जातोय, त्या सर्वांना २०२४ ला मोक्ष मिळेल
गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्माचा अपमान करणारी विधाने केली जात आहेत. सनातन धर्माला शिव्या-शाप दिले जात आहेत. या सर्वांना २०२४ मध्ये मोक्ष मिळेल, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. काशी येथे बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, सनातन धर्माचे मर्म काशीत आहे. काशी ही शाश्वत नगरी आहे. अनादी आणि अनंताची उपासना करण्याचे हे एक उत्तम तीर्थक्षेत्र आहे. हे ज्ञान आणि मोक्षाचे शहर आहे. त्यात युगानुयुगे देवत्व होते. पंतप्रधान मोदींनी याची भव्यता वाढवली, असे कौतुकोद्गार बाबा रामदेव यांनी काढले.
दरम्यान, काशी हे आता ते संपूर्ण जगाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. काशी हे भारतीय सांस्कृतिक वारसा असलेले हे महातीर्थ आहे. हेल्थ टुरिझम, धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटनासाठी काशी जगभरात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ज्ञान पर्यटन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक पर्यटन हे सनातन धर्माचे सार आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले.