नवी दिल्ली - योगगुरू रामदेव बाबा यांनी "गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावं" अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये रविवारी गो महासंमेलनाला संबोधित करताना रामदेव बाबा यांनी हे विधान केलं आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थान (टीटीडी) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले होते. "गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. हा प्रस्ताव टीटीडी ट्रस्टनेही पाठवला" असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे" असं देखील म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी "पतंजलीने गायींसाठी (Cow) गोरक्षण मोहीम सुरू केली आहे. गायींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही आघाडीवर आहोत" असं सांगितलं. यासोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांना टीटीडी गो महासंमेलनाबद्दल माहिती दिली होती. हिंदू धर्माचा प्रचार केल्याबद्दल त्यांनी टीटीडीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांचेही कौतुक केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"राजकीय दहशतवादापासून मोठा धोका; ते देश, समाज चालवत नाहीत"
"या जगासाठी सर्वात मोठा धोका हा जातीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद, राजकीय दहशतवाद आणि मेडिकल दहशतवादापासून आहे. मेडिकलवाल्यांबाबत मधे मी बोललेलो तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. राजकीय दहशतवाद सर्वात वर आहे, जातीय दुसऱ्या क्रमांकावर. सर्व धर्म नाहीतर सर्व पंथ असे नाव असायला हवे. पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म, वाऱ्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानव जातीचा धर्म एकच असणार" असं काही दिवसांपूर्वी योगगुरु आणि हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा (Baba Ramdev) यांना म्हटलं होतं.
"ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म"
"आम्ही सर्वांना हिंदू बनवू, मुस्लिम बनवू, इसाई बनवू यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस बनवू असे म्हटले पाहिजे. सर्व जगातील धर्माचार्य एकाच स्वरात म्हणाले की, आम्ही सारे एक आहोत तर किती चांगले होईल. कोणीतरी येतो, म्हणतो ब्राम्हण महान, ओबीसी महान, क्षत्रिय महान, शूद्र महान, हे काय आहे. आपण सारे एक आहोत. आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे. काही लोक संन्यासी होतात, लाडू खाऊन आपल्याला लोकांनी संन्यासी म्हणावे, अशी या लोकांची अपेक्षा असते. आपण एकाच देवाची मुले आहोत. एकाच धरतीवर राहतो असे सर्वांनी म्हणायला हवे", असंही रामदेव बाबा म्हणाले होते.