मुंबई : कांदा टंचाई निर्माण झाल्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात सध्याची कांद्याची परिस्थिती पाहता सरकारवर लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून आता रामदेवबाबा यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का,’ असा उलट प्रश्न योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलताना केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही व्यासपीठावर यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “काही मुलं अभ्यासावेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, काही लोक कामावेळी कामाकडे दुर्लक्ष करतात. मग म्हणतात बेरोजगारी वाढतेय. देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढतेय, गरिबी वाढतेय, देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे.
मोदीजी रोजगार द्या, मोदीजी आमच्या शेतीमालाला भाव द्या, मोदीजी महगाई हटवा, कांद्याचे दर वाढले आहेत, मग आता मोदीजी कांदे उगवतील का? तर गोष्ट ही आहे की आपल्या स्वत:ला मोठं काम करावं लागेल. आम्ही केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नयेत असे रामदेव बाबा म्हणालेत.
जगात ९९ टक्के लोक सामान्य कुटूंबात जन्माला आले, पण अशा लोकांनी प्रगती केली आहे. माझ्या शिक्षणासाठी फक्त पाचशे रुपये खर्च झाला आणि आज तुमच्यासमोर मी उभा आहे. तुम्ही असे काम करा की, सर्व जग तुमच्या मागे फिरून मला तुमच्या सारख काम करायचे आहे, असे म्हणेल,’ असेही रामदेव बाबा म्हणाले.