अहमदाबाद: केंद्रातील मोदी सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशातील अनेक ठिकाणांहून प्रचंड विरोध करण्यात येत आहे. या योजनेला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंदोलकांनी देशाच्या मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान केल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेला लष्करासह अनेकांचा पाठिंबाही मिळत आहे. यातच आता योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी अग्निपथ योजनेला पाठिंबा दर्शवला असून, या योजनेला विरोध करणारे राष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली आहे. ते गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
अग्निपथ योजनेविरोधात आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या, असे सांगितले जात आहे. देशाच्या संपत्तीचे होणाऱ्या नुकसानीबाबत बाबा रामदेव यांनी खेद व्यक्त केला आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करणारे राष्ट्रद्रोही
केंद्रातील मोदी सरकारच्या या योजनेचे समर्थन करताना बाबा रामदेव म्हणाले की, असे लोक महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक नाहीत. ते देशद्रोही आहेत, कारण ते आमच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करत आहेत. अग्निवीर तयार करण्याची योजना सरकारने विचारपूर्वक तयार केली आहे. याचा फायदा लष्कर आणि देशाला होईल. या योजनेला विरोध का होत आहे, हे समजत नाही. हिंसाचार आणि निदर्शने तातडीने थांबवायला हवीत, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी संघर्षातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेली व्यक्त
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील तर ते श्रीमंत कुटुंबातील होते म्हणून नाही. संघर्षातून त्यांनी हे स्थान मिळवले. एकेकाळी दिल्लीच्या (मनमोहन सिंग) सरकारने त्यांना मोठ्या अडचणीत टाकण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, त्यांच्या धाडसापुढे सरकारला झुकावे लागले, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले. दुसरीकडे, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी विधानावर बोलताना, त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. कोणत्याही धर्मावर टीका करणे चुकीचे आहे. पण आपल्या पूर्वजांवर टीका करण्यात आली असती, तर एवढा विरोध झाला नसता, असे सांगत, संपूर्ण जग प्रेषितांच्या समर्थनार्थ उभे राहिले. नुपूर जे बोलल होत्या, ती आवेशात केलेले विधान होते. दुसर्या प्रवक्त्याच्या आरोपाला त्या उत्तर देत होत्या, असे सांगत बाबा रामदेव यांनी नुपूर शर्मा यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.