Baba Ramdev vs Cupreme Court : बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीविरोधात असलेला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
सविस्तर माहिती अशी की, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पतंजलीवर कोरोना काळात पतंजलीच्या कोरोनिल आणि स्वसारी, या उत्पादनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती चालवल्याचा आरोप केला होता. IMA ने दाखल केलेल्या याचिकेत पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीमुळे ॲलोपॅथी औषधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले होते. त्यावर न्यायालयाने पतंजलीला खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता.
दरम्यान, पतंजलीने ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 सारख्या कायद्यांचे थेट उल्लंघन केल्याचेही IMA ने म्हटले. पतंजलीच्या दाव्यानंतर आयुष मंत्रालयानेही कंपनीला फटकारले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाही कंपनीने वृत्तपत्रांमध्ये या उत्पादनांची जाहिराती दिल्याबद्दल कंपनीला माफी मागण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, बाबा रामदेव यांनी कोर्टात आपला माफीनामा सादर केला, त्यामुळे आता हा खटला बंद करण्यात आला आहे.