ह्युस्टन : योगगुरू बाबा रामदेव यांना भारतात येत्या पाच वर्षांत वेगवेगळ्या विषयांत सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे जागतिक दर्जाचे विद्यापीठ सुरू करायचे आहे. या कामासाठी १५०० एकर जमीन मिळवूनही झाली आहे. बाबा रामदेव यांनी येथे ‘योग अॅण्ड इनर पीस’ या २३ आॅगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा जागतिक तोडीचा असेल. युनिव्हर्सिटी आॅफ ह्युस्टनच्या तोडीचे जागतिक दर्जाचे विद्यापीठ दिल्लीजवळ उभारण्याची माझी योजना आहे व या प्रकल्पाचा खर्च सुमारे २५ हजार कोटी रुपये आहे. हे नियोजित विद्यापीठ प्राचीन काळातील उच्च शिक्षण देणाऱ्या नालंदा व तक्षशीला विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे असेल व जगातून येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना भारतातील या विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध असेल.’’ बाबा रामदेव म्हणाले की, ‘‘शिक्षणाची गुरुकुल परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वैदिक शिक्षण मंडळ सुरू करण्याची विनंती केली आहे. नियोजित विद्यापीठाचा मुख्य भर हा आरोग्य, व्यवसाय आणि शिक्षण यावर असेल.’’ (वृत्तसंस्था)
बाबा रामदेव उभारणार विद्यापीठ
By admin | Published: August 29, 2016 2:35 AM