ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - योगगुरु बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या 'दिव्य पूत्रबीजक' या औषधावरुन गदारोळ निर्माण झाला असतानाच शुक्रवारी रामदेव यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर पलटवार केला आहे. मला टार्गेट करुन विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. पूत्रबीजक हे औषध मुलं होण्यासाठी असून फक्त मुलगा होण्यासाठी हे औषध नाही अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली आहे.
गुरुवारी जदयूचे खासदार के सी त्यागी यांनी राज्यसभेत बाबा रामदेव यांच्या फार्मसीतील 'दिव्य पूत्रबीजक' या औषधासंदर्भात गंभीर आरोप केले होते. हे औषध घेतल्यास मुलगा होतो असा दावा करत या औषधाची विक्री सुरु असल्याचे त्यागी यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले होते. यावरुन राज्यसभेत विरोधकांनी एकजूट दाखवत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात चौकशी करु असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाबा रामदेव यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जात त्यागी यांचे आरोप फेटाळून लावले. बाबा रामदेव म्हणाले, आमच्या औषधाच नाव पूत्रजीवक आहे, पण याचा अर्थ हे औषध मुल होण्यासाठी आहे, फक्त मुलगा होण्यासाठी नाही. विरोधकांना ऐवढा आक्षेप असेल तर आम्ही औषधाखाली 'पूत्रजीवक हे औषध फक्त मुलं होण्यासाठी असून यात मुलगा किंवा मुलगी यांचा संबंध नाही' असे स्पष्टीकरण देणारा संदेश छापून देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार चुकीचे मुद्दे संसदेत उपस्थित करत असून माझ्यावर आरोप करुन मोदींवर निशाणा साधण्याचे उद्योग विरोधकांनी सुरु केले आहेत असा आरोप त्यांनी केला.