माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातील एकाचं नाव धर्मराज राजेश कश्यप (१९, रा. बहराईच, यूपी), तर दुसऱ्याचं नाव गुरमेल बलजीत सिंह (२३, रा. कैथल, हरियाणा) असं आहे. गुरमेलच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, पण त्याची आजी जिवंत आहे आणि ती सध्या त्याच्या सावत्र भावासोबत राहते.
आज तकशी बोलताना गुरमेलच्या आजीने सांगितलं की, ती गुरमेलचा सावत्र भाऊ प्रिन्ससोबत राहते. २०१९ मध्ये गुरमेलने गावातील एका व्यक्तीची हत्या केली होती. तो त्यासाठी जेलमध्ये गेला होता, तीन-चार महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला आहे. मात्र, त्याचा जामीन नेमका कोणी केला, त्याला जामीन कसा मिळाला? याबाबत कोणालाच माहिती नाही.
गुरमेल जामिनावर बाहेर आल्यानंतर घरी आला होता आणि काही मिनिटच घरात थांबला. त्यावेळी आजी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. तिने गुरमेलला पाहिलं देखील नाही. इतक्या कमी वेळात तो निघून गेला. त्यानंतर आजीचा गुरमेलशी कोणताच संपर्क झाला नाही किंवा तो कोणत्याही सणासाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी घरी आला नाही. गुरमेल लहानपणापासून भांडत असे, त्यामुळेच घरातील लोकांनी ११ वर्षांपूर्वीच त्याला घरातून हाकलून दिलं होतं असं देखील आजीने सांगितलं आहे.
"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील आरोपी शिवाच्या आईने या सर्व धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. "माझा मुलगा स्क्रॅपयार्ड काम करण्यासाठी पुण्याला गेला होता. मला फक्त एवढच माहीत आहे. तो मुंबईत काय करत होता हे मला माहीत नाही" असं शिवाच्या आईने म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवाच्या आईने सांगितलं की, "आम्हाला आधी माहीत नव्हतं. माझा मुलगा पुण्यातील स्क्रॅपयार्ड येथे काम करायचा. त्यासाठीच तो पुण्याला जातो सांगितलं होतं. हेच आम्हाला माहीत आहे. मुंबईचं आम्हाला काहीच माहीत नाही."