अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपी शिवा हा यूपीच्या बहराइचचा रहिवासी आहे. आरोपीच्या आईने या सर्व धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. "माझा मुलगा स्क्रॅपयार्ड काम करण्यासाठी पुण्याला गेला होता. मला फक्त एवढच माहीत आहे. तो मुंबईत काय करत होता हे मला माहीत नाही" असं शिवाच्या आईने म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवाच्या आईने सांगितलं की, "आम्हाला आधी माहीत नव्हतं. माझा मुलगा पुण्यातील स्क्रॅपयार्ड येथे काम करायचा. त्यासाठीच तो पुण्याला जातो सांगितलं होतं. हेच आम्हाला माहीत आहे. मुंबईचं आम्हाला काहीच माहीत नाही. तो काय खातो आणि काय कमावतो याबाबतही आम्हाला माहिती नाही. तो होळीच्या दिवशी घरी आला. त्यानंतर गेला तो आलाच नाही."
"माझ्याशी फोनवरही तो बोलत नव्हता, त्यामुळे या घटनेबाबत मी काहीही बोलू शकत नाही. त्याचं वय १८-१९ वर्षे आहे. तो इथे राहत असताना कधी तंबूत काम करायचा तर कधी विटा उचलण्याचं काम करत असे. बाहेर गेलो तर तीन वर्षात कमाई करेन, असं म्हणायचा. आम्हाला सगळं सांगायचा नाही. पैसे कमावून आम्हाला दिले नाहीत. मुलगी आजारी असताना तीन हजार रुपये पाठवले होते."
मुंबई पोलिसांनी घटनेच्या रात्रीच तीन आरोपींपैकी दोघांना पकडलं होतं, तर तिसरा आरोपी शिवा अद्याप फरार आहे. शिवा पुण्यात ५-६ वर्षे काम करत होता. या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत.