नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर मशीद बांधण्याची बाबराने केलेली ‘ऐतिहासिक चूक’ होती. हिंदूंची पुरातन काळापासूनची श्रद्धा लक्षात घेऊन, त्या वादग्रस्त जागेवरील हिंदूंचा हक्क मान्य करून ती चूक सुधारण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन हिंदू पक्षकारातर्फे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केले गेले.
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या विशेष पीठापुढे ३९व्या दिवशी महंत मोहन दास या पक्षकाराच्या वतीने अॅड. के. पराशरन यांनी युक्तिवाद केला. या जागेच्या मालकीसंबंधी उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने केलेल्या दिवाणी दाव्यात महंत मोहनदास प्रतिवादी आहेत.
सरन्यायाधीश गोगोई १९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने, त्या आधी निकाल देणे शक्य व्हावे, यासाठी सर्व पक्षांनी १७ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद संपवावेत, असे खंडपीठाने सांगितले होते, परंतु युक्तिवाद बुधवारीच आटोपते घेतले जातील, असे संकेत आहेत.
बाबरी मशीद बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केली असली, तरी त्यामुळे त्या जागेवरील मुस्लिमांचा हक्क संपुष्टात येत नाही. पुरातत्व विभागाच्या उत्खननात तिथे पूर्वी भव्य वास्तू (कदाचित मंदिर) असल्याचे संकेत देणारे भग्नावशेष मिळाले, म्हणून मशिदीची जागा हिंदूंची होऊ शकत नाही. इतिहासात मागे जाऊन शासकांच्या कृतींची योग्यायोग्यता न्यायालये तपासू लागली, तर याला अंतच राहणार नाही. स्वातंत्र्य व गणराज्य स्थापनेनंतर भारत उदयास आल्याने अशा वादांना १९४७ते १९५० पर्यंतच मागे जाण्याची मर्यादा घालावी लागेल, असा युक्तिवाद सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने ज्येष्ठ वकील डॉ. अनिल धवन यांनी केला होता.त्यावर महंत मोहन दास यांच्यातर्फे पराशरन यांनी बाबराने केलेली चूक सुधारण्याचा मुद्दा मांडला. बाबराने आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला. तो शासक झाला, तरी त्याची लहर व मर्जी हाच त्याचा कायदा होता. त्यातूनच श्रीराम जन्मभूमीवर त्याने मशीद बांधली, असे ते म्हणाले.एकदा मशीद म्हणून वापरली गेलेली वास्तू कायम मशीदच राहते, असे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे आहे. बाबरी मशीद पाडली, तरी त्याने त्या जागेवरील आमचा हक्क संपत नाही. यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे न्यायमूर्तींनी पराशरन यांना विचारले असता, पराशरन म्हणाले की, या म्हणण्यात काही अर्थ नाही. अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानी मशीद उभारू नये, असे इस्लाम सांगतो. एकदा असलेले मंदिर हे कायमसाठी मंदिरच असते, असे आम्हीही म्हणतो, तेही मान्य करावे लागेल.
तक्रार आणि पृच्छातुम्ही फक्त माझ्यावरच प्रश्नांची सरबत्ती करता. हिंदू पक्षकारांना एवढे प्रश्न विचारत नाही, अशी तक्रारवजा नाराजी डॉ. धवन यांनी सोमवारी व्यक्त केली. ते लक्षात घेऊन न्यायमूर्तींनी पराशरन यांनाही अनेक मुद्द्यांवर खोदून प्रश्न विचारले आणि नंतर डॉ. धवन यांच्याकडे ‘आता समाधान झाले का?’ अशी पृच्छाही केली.