समाजाने दुष्काळग्रस्तांना बळ द्यावे बाबासाहेब पुरंदरे : साहित्य प्रसार केंद्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM
नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरंदरे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. गो. ह. देशपांडे, कार्याध्यक्ष अनिल भालेराव, मकरंद कुलकर्णी, रोहिणी बलंग आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पुरंदरे यांनी तरुणपिढीचा चंगळवाद आणि सामाजिक बांधिलकीविषयी असलेल्या त्यांच्या उदासीन भूमिकेवर टीका केली. तरुणांनी केवळ सोशल मीडिया किंवा सिनेमागृहामध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा समाजसेवेचे कार्य निष्कामपणे पार पाडावे, असे यावेळी आवाहन केले. ते पुढे म्हणाले, सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुष्काळ निवारणाचे व्यवस्थापन आणि त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत गोरगरीब जनतेसाठी आशेचे किरण ठरतील अशा आखलेल्या विविध योजनांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. महाराजांच्या जन्माच्या वेळी दोन वर्षे दुष्काळाची स्थिती होती. महाराजांना हे आई जिजाऊने जेव्हा सांगितले तेव्हा महाराजांनी दुष्काळाशी लढा देण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यांची दूरदृष्टी, उत्तम व्यवस्थापन, संवेदनशीलता शिकण्यासारखी आहे. आजच्या तरुणपिढीने त्यांच्या इतिहासातून हे धडे घेण्यासारखे असून, केवळ जयजयकार आणि जयंतीदिनी शहरातून दुचाकीवरून मिरविण्यापेक्षा शिवरायांनी जनहिताचे केलेले कार्य अभ्यासून त्यामधून प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे, असे पुरंदरे यावेळी म्हणाले. प्रास्ताविक ज्योती अष्टपुत्रे यांनी केले व आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले.इन्फो.........यांच्या कार्याचा सन्मानरुग्णसेवेचे व्रत निष्ठेने जोपासणारे डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव (सन्मानपत्र, अकरा हजारांचा धनादेश) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बर्वे यांनी पुन्हा संस्थेला सामाजिक कार्यासाठी धनादेश प्रदान केला. सेवानिवृत्तीनंतरही गोरगरिबांना शिक्षण देण्याचे कार्य करणार्या कुसुम बुरकुले, आदिवासी भागांमध्ये जाऊन तेथील गोरगरीब कुटुंबांना वैद्यकीय सेवा देणार्या शकुंतला मांकड, कुमुदिनी फेगडे, स्वाती वानखेडे यांना सन्मानपत्र व प्रत्येकी अनुक्रमे अडीच हजार, पाच हजार तर अन्य पुरस्कारार्थींना सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.