Sukhbir Singh Badal :पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोळीबाराची घटना घडली. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले आहेत. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल धार्मिक शिक्षा म्हणून पहारा देत असताना सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडली. सुखबीर यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे, त्यामुळे ते व्हीलचेअरवर बसून हातात भाला घेऊन बसले होते. सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्या व्यक्तीचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आलं आहे.
सुवर्ण मंदिर परिसरात अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या हत्येचा प्रयत्न नारायण सिंह चौडा नावाच्या व्यक्तीने केला होता. हरमंदिर साहिबच्या व्हिडीओ फुटेजमध्ये नारायण सिंग पिस्तूल घेऊन येतात आणि सुखबीर सिंग यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नारायण सिंग हातात पिस्तूल घेऊन आला आणि त्याने सुखबीर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेले लोक सावध झाले आणि त्यांनी थेट नारायण सिंगला रोखलं. तितक्यात नारायण सिंगने ट्रिगर दाबला आणि गोळी हवेत झाडली गेल.
नारायण सिंग चौडा हे खलिस्तानी दहशतवादी म्हणून ओळखला जातो. नारायण सिंग हा बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (बीकेआय) दहशतवादी आहे. चंदीगड जेल ब्रेक प्रकरणातीलही तो आरोपी आहे. जमावाने हल्लेखोर नारायण सिंगला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस नारायण सिंगची सध्या चौकशी करत आहेत.
नारायण चौरा १९८४ मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या मोठ्या खेपांची तस्करी करण्यात त्याचा हात होता. पाकिस्तानमध्ये राहून त्यांने गनिमी युद्ध आणि देशद्रोहाचे साहित्य यावर एक पुस्तकही लिहिले आहे. बुडैल जेलब्रेक प्रकरणातीलही तो आरोपी आहे. नारायण याने यापूर्वी पंजाबमधील तुरुंगात शिक्षा भोगली आहे.