नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची (Delhi Jahangirpuri Violence) सध्या सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारणही सुरू झालं आहे. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे. तर, सुवर्णपदक विजेता आणि भाजप कार्यकर्ता बबिता फोगाटनेही वादग्रस्त ट्विट केलं आहे. सध्या बबिताचं ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
अमित शाह यांनी हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये. दिल्लीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना देखील अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानंतर, प्रशासनाकडून अतिक्रमणच्या नावाखाली बुलडोझर फिरविण्यात येत आहे. मात्र, या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, बबित फोगाटने दिल्ली हिंसाचारप्रकरणी वादग्रस्त ट्विट केलंय.
दिल्ली हिंसाचारप्रकरणातील आरोपी अन्सार यास हरयाणातील भाजपने आम आदमी पक्षाचा नेता असल्याचे म्हटले. तर, पलटवार करताना आपने त्यास भाजप नेता असल्याचे सांगितले. हरयाणाच्या क्रीडा विभागाच्या सहसंचालक आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने दिल्ली हिंसाचारप्रकरमी विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं. आम आदमी पक्षानेच दिल्लीत हनुमान जयंतीला दंगल घडवल्याचा आरोप बबिताने केला आहे. आप ही हिंसा करणारी पार्टी आहे, शाहीन बाग दंगलीमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे. तर, जहांगीरपुरा येथील दंगलीचा तपास पूर्ण झाल्यानंतरही हे समोर येईल, असे बबिताने म्हटले आहे.
तपास जलद गतीने करण्याचे निर्देश
दिल्ली हिंसाचार प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून देशभरात राजकरण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत.
दिल्लीत बुलडोझर, कारवाई थांबविण्याचे कोर्टाचे आदेश
उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. पण कारवाईला सुरुवात होण्याच्या काही मिनिटांत सुप्रीम कोर्टानं जहांगीरपुरीमधील एमसीडीच्या कारवाईला स्थगितीचे आदेश दिले. आता याप्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं आदेश जारी केलेत. विशेष म्हणजे पालिकेकडून अजूनही कारवाई थांबविण्यात आलेली नाही. या कारवाईनंतर सोशल मीडियात फोटो व्हायरल झाले आहेत.