ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - अयोध्यामधील बाबरी खटला प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासहीत अन्य 12 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मंगळवारी सीबीआयच्या विशेष कोर्टानं आरोपींविरोधात कलम 120 बी अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
डिस्चार्ज अर्जाद्वारे आरोपींनी दोषारोप हटवण्याची मागणी केली होती. बाबरी मस्जिद उद्धवस्त करण्यात आमची कोणतीही भूमिका नाही, असेही आरोपींनी भूमिका मांडली होती. मात्र त्यांची ही मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे.
मात्र, त्यांना तूर्तास दिलासा देत कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्व आरोपींना जामीन देण्यात आला आहे.
योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट
कोर्टात दाखल होण्यापूर्वी आडवाणी आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमधील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली.
तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यदेखील भाजपा नेत्यांची भेट घेण्यासाठी तेथे दाखल झाले होते. कोर्टात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कार्यवाही सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव कामकाजात उशीर झाला. दरम्यान, कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संबंधितांना वगळता अन्य कुणालाही आत येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रसिद्धी माध्यमांनाही कोर्ट परिसराबाहेर वार्तांकन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
19 एप्रिल रोजी सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी आज यांच्यासह 13 जणांवर आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.
Babri case: Senior BJP leader LK Advani and others reach special CBI court in Lucknow pic.twitter.com/IiKl5wyBip— ANI UP (@ANINewsUP) May 30, 2017
काय आहे नेमके प्रकरण ?
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी रायबरेली आणि लखनौ येथील कोर्टात सुनावणी सुरूआहे. लखनौ कोर्टात कारसेवकांविरोधात तर, रायबरेली येथील न्यायालयात व्हीव्हीआयपी आरोपींविरोधात खटल्याची सुनावणी सुरू आहे.
बाबरी प्रकरणी 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आडवाणींसह 13 नेत्यांवरुन गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप हटवला होता. सीबीआयने हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आडवाणी, जोशी, उमा भारतींवर चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप आहे.
या भाषणांनी प्रेरीत होऊन कारसेवकांनी 1992 साली बाबरी मशीद पाडली. बाबरी मशीद पाडली त्यादिवशी जवळच उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरुन या नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे दिली. बाबरी मशीद पाडण्याचा कटाचा हा एक भाग होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे.
Delhi: Senior BJP leader LK Advani reaches airport to leave for Lucknow. He has to appear before a special CBI court in #Babri case today pic.twitter.com/56QByopxx8— ANI (@ANI_news) May 30, 2017