नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद््ध्वस्त केल्याशी संबंधित खटल्यांचे काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही. शिवाय खटला चालविणारे सत्र न्यायाधीश दोन महिन्यांत निवृत्त होणार असल्याने पुढे काय करायचे यावर सर्वोच्च न्यायालय येत्या शुक्रवारी विचार करणार आहे.या घटनेसंबंधी फैजाबाद व लखनऊ येथे त्यावेळी दाखल झालेले दोन खटले एकत्र करून ते फैजाबाद येथे चालविण्यात येत आहेत. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती यांच्यासह भाजप व संघ परिवारातील इतरही अनेक नेत्यांवर गुन्हेगारी कट-कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.दि. १९ एप्रिल २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही खटले एकत्र चालवून त्याचे काम दोन वर्षांत संपविण्याचा आदेश दिला होता. ती मुदत संपली आहे व खटला चालविणारे न्यायाधीश येत्या सप्टेंबरमध्ये निवृत्त व्हायचे आहे. त्यांनी आणखी सहा महिने मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सोमवारी हा विषय आला असता यातून कसा मार्ग काढायचा यावर उत्तर प्रदेश सरकारचे उत्तर मागवून येत्या शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली.
मुदत संपूनही बाबरी खटला अपूर्ण; शुक्रवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:12 AM