नवी दिल्ली - बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच काँग्रेसने या षडयंत्रासाठी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.
सत्यमेव जयते! असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट देखील केले आहे. "सत्यमेव जयते! सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. तत्कालीन काँग्रेस सरकारने राजकीय पूर्वग्रह दूषितपणातून संत, भाजपाच्या नेत्यांवर, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर, समाजसेवकांना खोट्या गुन्ह्यात फसवून बदनाम करण्यात आलं. या षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागायला हवी" अशी मागणी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
न्यायालयाने एकूण 32 आरोपींवर आज निकाल दिला. यावेळी आरोपींपैकी साध्वी ऋतुंभरा, विनय कटियार, चंपतराय, साक्षी महाराज आणि जय भगवान गोयल हे न्यायालयात उपस्थित होते. तर आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी न्यायालयात उपस्थित नव्हते. या प्रकरणावर निकाल देताना न्यायमूर्ती एस.के. यादव यांनी सांगितले की, बाबरी मशीद ही नियोजबद्धरीतीने पाडण्यात आलेली नाही. नेत्यांनी करसेवकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींच्या विरोधात फोटो, व्हिडीओ आणि फोटोकॉपीच्या माध्यमातून पुरावे देण्यात आले. मात्र त्यामधून काहीही सिद्ध होत नाही. तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्याविरोधात काहीही पुरावे मिळालेले नाहीत, असे सांगत न्यायमूर्तींनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर आडवाणींनी आनंद व्यक्त केला. 'सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेल्या निकालाचं मी मनापासून स्वागत करतो. राम मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात मी आणि भाजपनं स्वत:ला झोकून दिलं होतं. हा निर्णय राम मंदिराबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करणारा आहे,' असं आडवाणी म्हणाले. 'सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबर २०१९ मध्ये राम मंदिराबद्दलचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे भव्य राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. आता बाबरी मशीद प्रकरणाचाही निकाल आला आहे. या सगळ्या पाठोपाठ घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहून आनंद वाटतो,' अशी भावना आडवाणींनी व्यक्त केली.
निकालापूर्वी वेदांती म्हणाले होते रामलल्लांसाठी फाशीलाही तयार
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेत्या उमा भारती यांच्याविरोधत होती. आरोपींपैकी एक असलेले रामजन्मभूमी न्यासचे सदस्य रामविलास वेदांती (Ram Vilas Vedanti) म्हणाले होते की, 'आम्हाला विश्वास आहे, की मंदिर होते, मंदिर आहे आणि मंदिर राहील. आम्ही तो ढाचा तोडवला, याचा आम्हाला अभिमान आहे. ढाचा तोडण्याच्या आरोपात फाशी झाली, जन्मठेपेची शिक्षाही झाली, तरी आम्ही रामलल्लासाठी जेलमध्ये जाण्यास आणि फासावर जाण्यास तयार आहोत. मात्र, रामलल्लांना सोडण्यास तयार नाही.'