Babri Masjid Demolition Verdict : ही ज्युडीशरी नव्हे तर मोदीशरी, बाबरी निकालानंतर काँग्रेस खासदाराचा संताप
By बाळकृष्ण परब | Published: September 30, 2020 04:26 PM2020-09-30T16:26:23+5:302020-09-30T16:29:47+5:30
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सुमारे २८ वर्षे सुरू असलेल्या खटल्यामध्ये निकाल देताना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी या निकालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशातील ज्युडीशरी (स्वतंत्र न्यायव्यवस्था) पासून मोदीशरी (मोदींच्या प्रभावाखालील न्यायव्यवस्था) होण्याचा दिशेने वाटचाल करू लागली आहे.
(1/2) When Justice is not done, it brings terror to the righteous souls and exhilarating joy to the evildoers. When verdict is awarded much to the delight of the Govt, the author is rewarded with sumptuous pelf and perquisite,
— Adhir Chowdhury (@adhirrcinc) September 30, 2020
अनेकदा वादग्रस्त विधाने करणारे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना या निकालामुळे सत्यवादी लोकांच्या मनात भीतीची भावना निर्माण होईल आणि अपप्रवृत्ती आनंद साजरा करतील, असे विधान केले. ते म्हणाले की, जेव्हा न्याय होत नाही तेव्हा सत्याच्या बाजूने असलेल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण होते. तर चुकीचे वागणारे लोग आनंदीत होतात. जेव्हा निकाल सरकारला खूश करण्यासाठी दिला जातो तेव्हा निकाल देणाऱ्याला अपार संपत्ती आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते. आता असे वारंवार घडेल अशी शंका येते. भारत ज्युडीशरी ऐवजी मोदीशरीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
(2/2) this may be the recurring phenomenon, India is heading towards modiciary instead of Judiciary.
— Adhir Chowdhury (@adhirrcinc) September 30, 2020
सगळेच निर्दोष असतील, तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का?; ओवेसींचा सवाल
बाबरी मशीद प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष आहेत. मग बाबरी मशीद कोणी तोडली. ती जादूनं पडली का?, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर विश्वास असणाऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश आज देण्यात आला, अशा शब्दांत ओवेसींनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.