हैदराबाद - दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन, कायदेशीर लढाईनंतर आज अखेरीस अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणार आहे. कोरोनाचे सावट असले तरी या सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
असदुद्दीन ओवेसींनी आज बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केले आहे. बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. बाबरी जिंदा है, असे ओवेसींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओवेसींनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे हे त्यांनी घेतलेल्या शपथेच्याविरोधात असल्याचे म्हटले होते.
असुदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे, असेही ओवेसी त्यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा प्रश्नार्थक रोखही औवेसी यांनी बोलून दाखवला होता.
बाबरी मस्जीद ही मशिद असून ती कायम राहणार, ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडण्यात आली नाही, मी त्या निकालाचा विचार करत नाही. इतिहासात सन 1949 मध्ये काय घडलं हे पाहायला हवं. ज्यावेळी मशिदीत गुप्तपणे मुर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर, 1992 मध्ये मशिद पाडण्याची घटना घडली. जोपर्यंत मुस्लीम आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोकं आहेत, तोपर्यंत आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की, आपली मस्जीद पाडलीय. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही आमच्या मार्गाने ते सांगणारचं, अशा शब्दात औवेसी यांनी बाबरी मस्जीद पाडल्याची घटना घडल्याचे सांगितले होते.