रांची: झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी १४ वर्षांनंतर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी १७ फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी झारखंड विकास मोर्चाचं भाजपामध्ये विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत मरांडी झारखंड विकास मोर्चा भाजपामध्ये विसर्जित केला जात असल्याची घोषणा करतील. बाबुलाल मरांडी यांनी काल दिल्लीत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी ओमप्रकाश माथूरदेखील उपस्थित होते. या बैठकीत झारखंड विकास मोर्चाच्या भाजपामधल्या विलीनीकरणाचा दिवस निश्चित करण्यात आला. याआधी शनिवारी बाबुलाल मरांडी यांनी अमित शहांची भेट घेतली होती. झारखंड विकास मोर्चानं ११ फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चानं विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. यानंतर याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाईल.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मरांडी यांना घरवापसीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री सी. पी. सिंह यांनी मरांडी यांच्या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्यांना भाजपाची विचारसरणी मान्य असेल, ते पक्षात सहभागी होऊ शकतात. भाजपामध्ये व्यक्तीवादाला स्थान नाही. पक्षात केवळ विचारधाराच महत्त्वाची आहे, असं सिंह म्हणाले. २००६ मध्ये बाबुलाल मरांडी भाजपामधून बाहेर पडले. त्यांनी झारखंड विकास मोर्चाची स्थापना केली. गेल्या डिसेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळीच मरांडी घरवापसी करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. या निवडणुकीत मरांडी यांच्या पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या. तर भाजपाच्या १२ जागा कमी झाल्यानं त्यांना राज्यातली सत्ता गमवावी लागली.
भाजपाची ताकद वाढणार; संपूर्ण पक्षच हाती कमळ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:21 PM